औरंगाबाद- महानगरपालिकेच्या शहर बससेवेचा शुभारंभ आणि कांचनवाडीतील एसटीपी प्लॅन्टचे उद्घाटन उद्या सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्रेय्य घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. सेनेच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने कार्यक्रमात सहभागी न होता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर सेनेच्या पदाधिकार्यांनी उद्या उद्घाटन होत असतांना युतीतील मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी आणि सदस्यांना कार्यक्रमाचेच निमंत्रण दिलेले नाही. तसेच प्रशासनानेही कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने उदघाटनाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. असे असले तरी उद्याचा कार्यक्रम होणार असल्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.
महानगरपालिकेला
केंद्र आणि राज्य सरकारने भूमिगत गटार योजना राबविणे, गटार योजनेतील
दुषित पाण्यावर एसटीपी प्लान्ट उभारणे यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला. तसेच
राज्य सरकारने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटीचा निधी दिला. कचर्याची
समस्या सोडविण्यासाठी हा निधी दिला. तसेच शहर बस सुरु करण्यासाठीही सरकारने निधी
दिला. शासनाने निधी दिल्यामुळे शहरात मोठी कामे होणार आहेत. पण या कामांचे श्रेय
घेण्यावरुन सध्या सेना भाजपात वादंग निर्माण झाले आहे. २३ डिसेंबर रविवार रोजी शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले
यांनी सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटने करण्याचा निर्णय घेतला आहे.
आदित्य ठाकरे उद्या शहरात येणार आहेत. त्यांच्यासमोरच भाजपा सेनेतील वाद
चव्हाट्यावर येणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना बोलविण्यास
हेतुपुरस्परपणे सेनेने ऐनवेळी निर्णय घेतल्याची सल भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये
होती. त्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यामुळे महापौरांची भेट
नाकारत ३ जानेवारी रोजी
शहरात येणार असल्याचे सांगुन भाजपाने सेनेची कोंडी केली. उदघाटनापूर्वीच सोहळा
वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
एमआयएमचा सहभाग
नाही- आ. जलील
उद्या
महानगरपालिकेच्या वतीने राज्य शासनाने दिलेल्या निधीतून विविध विकास कामांचा
शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबत पालिकेतील विरोधी पक्षाच्या
नेत्यांना कोणतीही माहिती किंवा साधे निमंत्रणही नाही. तसेच प्रशासनाचा जर त्यात
सहभाग नसेल तर आमचा पक्ष सहभागी होण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती आमदार
इम्तियाज जलील यांनी दिली. सेना-भाजपामध्ये सध्या आपसात एकमेकांचे कपडे फाडण्यात
येत आहेत. त्यांच्या वादाशी आम्हाला देणे घेणे नाही. सेना आणि भाजपा श्रेय्यासाठी
भांडत आहेत. जनतेच्या पैशातून सदरील विकास कामे होत आहेत. ठाकरे परिवाराने किंवा
मुख्यमंत्र्यांनी घरातून निधी दिलेला नसून जनतेच्या पैशातून विकास कामे होत आहेत. त्याचे उद्घाटन
नेते आणि मंत्र्यांच्या हस्ते करण्याऐवजी शहरातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या
हस्ते केले तर बरे होईल, असे आमदार जलील यांनी सांगितले. महापौर मनमानी
कारभार करीत असल्याची टीकाही जलील यांनी केली.
सर्वांना
निमंत्रण दिले जाईल - महापौर
काल रात्री
निमंत्रण पत्रिका छापल्या सर्वाना निमंत्रण जाईल. महानगरपालिकेचा कार्यक्रम
आहे.कार्यक्रमातील सहभागाबाबत ज्याने-त्याने ठरवावे. खोडा घालण्याचा प्रयत्न न
करता सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा अशी माझी विनंती. नावावरून श्रेय वादाची
लढाई आम्हा पदाधिकार्यांत असते मनपा आयुक्तांना नावाचे असे काही नाही.त्यांना
नावाचा काय फायदा होणार ? बस गोरगरीबाकरिता असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.
भाजपला
निमंत्रणच नाही- आ. सावे
मनपातर्फे करण्यात येणार्या विकास कामांचा शुभारंभाची
पत्रिकाच अद्याप मिळालेली नाही. कार्यक्रमाचे आमंत्रणच नसल्याने तसेच प्रशासन जर
कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याने हा शिवसेनेचा वैयक्तिक कार्यक्रम असावा, अशी टीका भाजपाचे आमदार अतुल सावे
यांनी सेनेवर केली. सावे यांच्या वक्तव्यावरून भाजपा उद्या होणार्या कार्यक्रमात
सहभागी होणार नसल्याचेच दिसते. भाजपा नेते आणि नगरसेवकांची आज बैठक होणार आहे.
त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.